चंद्रपूर : महानगरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद्रपुरकरांची डोकेदुखी वाढत आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला तर, अनेक जखमी झाल्याच्या घटना महानगरात मागील काही वर्षात घडल्या आहेत. त्यामुळे महानगरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध संघटनांनी रेटून धरल्यानंतर मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्र्यांची ‘नसबंदी’ करण्याची मोहीमच महानगरपालिकेने सुरू केली आहे. यासाठी अमरावती येथील एक पथक चंद्रपुरात दाखल झाले असून कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.महानगरात मागील काही वर्षात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे रात्री रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दहशतीच्या सावटाखाली प्रवास करावा लागत होता. अनेक मोकाट कुत्र्यांचे टोळके एकट्या, दुकट्या जाणाऱ्या इसमावर हल्ला करायचे. लहान बालकांनाही मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विविध संघटना, चंद्रपुरकरांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी महानगरपालिकेकडे केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल स्वत: महापौरांनी गांभीर्याने घेतली होती. कुत्रे पकडण्यासाठी वाहन खरेदी करण्यात येऊन कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु कुत्रे महानगरालगतच्या जुनोना, लोहाराच्या जंगलात सोडले जात होते. त्यामुळे हे कुत्रे काही दिवसांनी परत शहराकडे येऊ लागले. शिवाय, वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे वन्यप्राणी संघटनेनी या मोहिमेला विरोध केला. यानंतर मनपाच्या ‘डम्पिंग यार्ड’ जवळ मनपाच्या कुत्र्यांसाठी निवासगृह बांधण्यात आले. परंतु कुत्रे पकडण्याची मोहीमच थंडबस्त्यात आहे. यानंतर पुन्हा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रमच हाती घेण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)
मोकाट कुत्र्यांची ‘नसबंदी’
By admin | Updated: August 4, 2014 23:40 IST