झेंडा जाळला : वरोऱ्यात विदर्भवाद्यांचे आंदोलनवरोरा : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याच्या निषेधार्थ आज बुधवारी विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वरोरा तालुक्याच्या वतीने मनसेचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. स्वतंत्र विदभार्साठी येत्या ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन मुंबई येथे १३ सप्टेंबरला केले होते. त्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व गोंधळ घालून काही काळासाठी पत्रकार परिषद बंद पाडली होती. त्याचे पडसाद आज बुधवारी वरोरा शहरात पाहावयास मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमेटी सदस्य व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील सद्भावना चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून मनसेच्या विरोधात निदर्शने देण्यात आली व निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अॅड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला व पत्रपरिषद उधळून लावली. मनसे पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचे सदर कृत्य हे घटनाविरोधी आहे. या कृत्याचा तिव्र निषेध व्यक्त होत आहे,असेही ते म्हणाले.मनसेने फडकविला झेंडाविदर्भवाद्यांनी मनसेचा झेंडा जाळला. या घटनेला मनसेचे तालुका अध्यक्ष मनीष जेठानी यांनी प्रतिउत्तर दिले. मनसेच्या झेंड्यावर अखंड महाराष्ट्र असे लिहून सदर झेंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फडकविला व अखंड महाराष्ट्राचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मनीष जेठानी म्हणाले, स्वयंम घोषित विदर्भवादी नेत्यांना मनसे जशाच तसे उत्तर देईल. स्वत:च्या निष्क्रियतेच खापर महाराष्ट्रावर फोड़ू नका. यानंंतर स्वतंत्र विदभार्साठी आंदोलन केल्यास मनसे आंदोलन उधळून लावेल. राजुऱ्यातही विदर्भवाद्यांचे आंदोलनराजुरा : राजुरा येथील पंचायत समिती चौकात विदर्भवाद्यांनी मुंबई येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करून मनसेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याप्रसंगी विदर्भवादी प्रभाकर दिवे, प्रा.अनिल ठाकुरवार, अॅड. अरुण धोटे, मकसुद अहमद, डॉ. सुरेश उपगन्लावार, अनंता येरणे, कपील इद्दे, अॅड.राजेंद्र जेनेकर, अॅड. सदानंद लांडे, बंडू माणुसमारे, रमेश नळे, सुभाष रामगीरवार, बळीराम खोजे, नरेंद्र काकडे, शेषराव बोंडे, भाऊजी कन्नाके, प्रशांत माणुसमारे, प्रशांत तेल्कापल्लीवार, गजानन कानपटे, मधुकर चिंचोळकर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मनसेच्या भ्याड हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 15, 2016 00:54 IST