पुगलिया यांचा घणाघाती आरोप : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसाठी पंतप्रधानांना निवेदनचंद्रपूर : भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.चंद्रपूर जिल्हा विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी स्थानिक गांधी चौकात डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, उषा धांडे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रशेखर पोडे, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, नासिर खान, मजदूर सभेचे महासचिव वसंतराव मांढरे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन साईनाथ बुचे यांनी तर आभार गजानन गावंडे यांनी मानले.या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत नरेश पुगलिया यांनी विद्यमान सरकारच्या धोरणावरही टीका केली. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी व शेती उत्पादनाला आधारभूत मूल्य मिळावे म्हणून नोव्हेंबर २००४ मध्ये डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्यात शेतमालाला हमीभाव देण्याची शिफारस करण्यात आली. मात्र सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. मदतही मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
By admin | Updated: October 31, 2015 01:52 IST