भेजगाव : ग्रामिण भागातील निवडणुकीचा माहोल संपताच गावखेड्यातील मतदारांना पोट भराची चिंता भेडसावत असल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता मूल तालुक्यातील भेजगांव परिसरातील मजुरांचे जत्थेचे जत्थे मिरची तोडाईकरिता तेलंगणातील खमम जिल्हयात स्थलांतरित होत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मजूर परराज्यात अडकल्याने मजुरांचे चांगलेच हाल झाले. मजूर ऐन गावाकडे परतण्याच्या वेळेवरच कोरोनाने कहर केल्याने प्रशासनाला लाकडॅाऊन करावा लागला. परिणामी मिळेल त्या साधनानी तर काहींनी पायी प्रवास करीत गाव गाठले. गावात आल्यावरही कुटुंबापासून दूर राहत क्वारंटाईन राहिल्याने मजुर रडकुंडीस आले.
यावर्षीही परराज्यात स्थलांतरित होऊन मिरची तोडणे म्हणजे परिस्थिती चांगली नसली तरी मजुरांकडेही पर्याय नसल्याने हातावर आणुन पानावर खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गावात दुसरा रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरही स्थलांतरीत होत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवासाची साधने पूर्णतः सुरु झाले नसल्याने मजुरांसमोर प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण झाली. मात्र तेलंगणातील मालकांनीच या समस्येवर तोडगा काढत मालवाहक गाड्या मजूर नेण्यासाठी पाठवित आहेत. तर काहींनी रेल्वेची ऑनलाईन आरक्षण करुन मजुरांचे स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडत आहेत.