सचिन सरपटवार भद्रावतीआजच्या सुपरफास्ट जगात लोकांजवळ सगळं काही आहे. फक्त शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळं काही मिळविण्याच्या नादात मनुष्याने आपली जीवनशैली मात्र गमावली आहे. प्रचंड धकाधकीच्या, ताणतणावाच्या व आधुनिकतेचे अवडंबर करणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. काळाची हिच गरज ओळखून भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे यांनी सायकलिंगद्वारे जीवनशैली बदलविण्याचा एक संदेश तरुणाईला दिला आहे.एकेकाळी प्रत्येक घरची गरज असलेली ‘सायकल’ हल्ली कुठेतरी अडगळीत पडलेली सापडते. आज प्रत्येक जण दुचाकी, चारचाकी वाहनाच्या अहारी गेले आहे. यावर मात करण्यासाठी शरीरयष्टी टिकवून ठेवण्यासाठी डॉ. शिंदे यांनी दररोज ‘सायकलिंग’ करायला सुरूवात केली. सध्या ते दररोज ३० ते ४० किलोमिटरचे अंतर सायकलने पार करतात. दर आठवड्याला एक दिवस लांब पल्ला असतो. याअंतर्गत ते सायकलने नागपूरला जावून आले. पहाटे ४ वाजता येथील टप्प्यावरून निघून ते साडे सहा तासात नागपूरला पोहचले. यापूर्वी त्यांनी वरोरा, आनंदवन, टेमुर्डा, चंद्रपूर, तेलवासा, ढोरवासा, कोंढा, माजरीपर्यंत सायकलने प्रवास केला आहे.वर्षभराआधी डॉ. धनंजय बोकारे (नागपूर) यांचे फेसबुकवरील सायकलस्वारी (मनाली ते लेह) संबंधीची पोस्ट पाहून सायकलिंगकडे आकर्षित झाल्याचे डॉ. विवेक शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांचे मित्र अनिरूद्ध राईच यांचे सायकलप्रती असलेले प्रेम पाहून प्रेरित झाले. दोन ते तीन मित्रांंनी व्यायाम म्हणून सुरू केलेला सायकलिंग हा प्रकार अगोदर छंद व नंतर त्यांचा श्वास, हृदय, मासपेंशी व शरीराच्या व्यायामासाठी ‘सायकलिंग’ हा सर्वोत्कृष्ट व्यायाम असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.आजच्या परिस्थितीत समाजाला भेडसावणाऱ्या कितीतरी समस्यांचे उत्तर ‘सायकल’ या शब्दात असु शकते. पर्यावरण संरक्षण, शारीरिक-आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, वाहतुकीच्या कोंडीची समस्या, इंधन बचत अशा कितीतरी गोष्टी सायकलच्या वापराने तसेच सायकलिंगच्या व्यायामाने सुटू शकतात. ज्याप्रमाणे दिल्लीत वाहतुकीच्या समस्येसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला अनिवार्य झाला तोच प्रकार आपल्या भागात भविष्यात लागू होवू शकतो. सायकलीचा वापर नाईलाजास्तव करण्याची पाळी आपल्यावर येण्याआधी आपण ती स्वेच्छेने स्वीकारावी, असा संदेश डॉ. शिंदे यांनी दिला.
‘सायकलिंग’द्वारे जीवनशैली बदलविण्याचा तरुणाईला संदेश
By admin | Updated: February 8, 2016 01:10 IST