चंद्रपूर : ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके, या धुंद वातावरणात लाडक्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात आला. सकाळपासूनच मिरवणुका निघण्याला प्रारंभ झाला. दिवसभर तप्त ऊन्हं असतानाही भाविकांची अलोट गर्दी आणि बाप्पा मोरय्याचा गजर यामुळे अख्खे चंद्रपूर शहर निनादून गेले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची उसळलेली अलोट गर्दी आणि विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासूनच मिरवुका काढण्याला प्रारंभ झाल्याने जुना वरोरा नाका येथून कस्तुरबा गांधी मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास कस्तुरबा गांधी मार्गावर जटपुरा गेटपासून आझाद बगीचापर्यंत मिरवणुकांची रिघ लागली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मिरवणुका गांधीचा चौकात पोहोचल्या. यावेळी बाबुपेठ, गिरणार चौक परिसरातील गणेश मंडळेही मिरवणुकीत सहभागी झाले आणि ढोलताशे, डिजेची धूम सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावरविसर्जन मिरवणुका सुरू होत्या. अनेकांनी सादर केले आकर्षक देखावेअनेक मंडळांनी एकापेक्षा एक सरस देखावे सादर केले. यात दारूचे दुष्परिणाम, चंद्रपूर मनपामुळे शहराची झालेली वाईट अवस्था, मल्लखांब, आत्महत्या, झाडे वाचवा, पाणी वाचवा, श्रीकृष्णाचे कालीया मर्दन, महागाईचा भस्मासूर, टिव्हीवरील अश्लिलतेमुळे वेगळ्या वाटेने जाणारी नवी पिढी, अंधश्रध्दा निर्मुलन, देशात फोफावलेला भ्रष्टाचार, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, सर्व शिक्षा अभियान, रामायणातील श्रीरामाचे नौकाविहार, पंढरपूरचा विठ्ठल, अवैध वृक्षतोड थांबवा, भोंदू महाराज, पृथ्वी, अग्नी क्षेपणास्त्र, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अशा अनेक देखाव्यांचा समावेश होता.
‘बाप्पा मोरय्या’च्या गजरात गणरायाला निरोप
By admin | Updated: September 28, 2015 01:09 IST