फोटो
जिवती : तालुक्यातील शेणगाव येथे शनिवारी स्मृतिशेष शंकर मेकाले प्रतिष्ठान तथा श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय शेणगावतर्फे, स्मृतिशेष शंकर मेकाले यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन आणि लैंगिक शिक्षण यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रेणुका शंकर मेकाले, अध्यक्ष म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रकला उईके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कडवे, अनिल पस्तापुरे, डॉ. बिश्वास उपस्थित होते.
यावेळी स्त्रियांचे आरोग्य आणि मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर प्राथमिक आरोग्य केंद्र पाटनच्या डॉ. प्रतिभा राठोड यांनी महिलांना सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी मासिक पाळी या विषयावर कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि पालकांनी पण आपल्या किशोरवयीन मुलींना या नाजूक विषयातून जात असताना त्यासंबंधी अडचणी व त्रासाबद्दल जागृत करणे ही काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. सबंध व्याख्यानादरम्यान त्यांनी तरुणांना लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे तारुण्यात होणाऱ्या चुका कशा टाळाव्या, यावरदेखील मार्गदर्शन केले. डॉ. कुलभूषण मोरे यांनीदेखील महिलांना मासिक पाळीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थिंनी व महिलांना शेणगाव येथील गरीब नवाज मेडिकल, आरोही मेडिकल व संतयोगी विक्तुबाबा मेडिकल स्टोअर्स यांच्या सौजन्याने मोफत सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन बालाजी शिवमोरे यांनी केले. आभार रितेश मेकाले यांनी मानले.