जुने उमरहिरा सोयीसुविधांपासून दूर
कोरपना : तालुक्यात जुने उमरहिरा हे गाव आहे. या गावातील मध्यंतरीच्या काळात लोकांनी स्थलांतर केल्याने सदर गाव ओस पडले आहे. सद्यस्थितीत या गावात रस्ते , पाणी, वीज, आरोग्य शिक्षण आदी सुविधांची वानवा आहे.
कर्ज मिळविण्यात बेरोजगारांची अडचण
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी केला आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे
भद्रावती : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.
धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा
चंद्रपूर : अमननाला हा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प माणिकगड पहाडात असल्याने प्रेक्षणीय आहे. त्यामुळे दररोज या ठिकाणाला दूरवरून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. मात्र येथील वेस्ट वेअरकडे जाण्याचा रस्ता अत्यंत खडतर असल्याने पर्यटकांची गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
वरोरा : नगर परिषदच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील नाल्यांची योग्य स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून विविध वाॅर्डांत कचरा साचलेला दिसून येतो. स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र, त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे.