तळोधी (बा) : शासनाच्या निर्देशाला डावलून शिक्षण विभागाने खासगी शाळांवर वक्रदृष्टी ठेवली आहे. अनेक खासगी शाळांना या विभागाने पुस्तकेच पुरविली नसल्याने विद्यार्थ्यांवर पुस्तकाविनाच शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.बालकाचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते ८ या वर्गाला पुर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा दिला गेला आहे. वर्ग १ ते ८ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाची जबाबदारी शासनाने स्वत:कडे घेतली आहे. व यानुसार कोणताही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही किंवा त्याच्या शिक्षणाची प्रतारणा करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे संकेत आहेत. त्यामुळेच वर्ग १ ते ५ ची पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे ही शासनाच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची प्राथमिक जबाबदारी आहे. पंरतु शिक्षण विभागातील अडेलतट्टू अधिकाऱ्यांनी काही खासगी शाळातील वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच दिली नाही. त्यामुळे त्या शाळातील वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकाचा आधार घेऊन किंवा पुस्तकाविना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.संबंधित खासगी शाळातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितीकडील पुस्तकाचा साठा संपला असून ज्याठिकाणी जि.प. शाळामध्ये ४ था वर्ग होता, त्या वर्गाच्या पटसंख्येनुसार पुस्तके देण्यात आली आहे.आपण ५ वा वर्ग का सुरू केला, असा उरफाटा प्रश्न करीत आपणाला यावर्षी पुस्तके मिळणार नाही, अशा प्रकारची उत्तरे दिली जात आहे. वर्ग ५ वी व ८ वी ची पुस्तके बाजारात उपलब्धही नाही. त्यामुळे सदर खासगी शाळातील विद्यार्थ्यांवर पुस्तकाविनाच शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थी जुनी पुस्तके शोधत फिरत आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे. (वार्ताहर)
नियोजनाअभावी अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By admin | Updated: July 5, 2014 23:31 IST