विरुर (स्टे.) : काल रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे राजुरा तालुक्यातील अन्नुर, अंतरगाव व खांबाडा येथील सुमारे ३० घरांची पडझड झाली. तसेच अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा काल खंडित होता.राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या गाव परिसरात काल सायंकाळी वादळासह जोरदार पाऊस झाला. अन्नुर अंतरगाव येथील वसंता येलमुले, राजाराम लेटकरी, प्रमोद कुळसंगे, गणपत सिडाम, विठ्ठल खेकारे, राजम गोगुलवार यांच्यासह अनेकजणांच्या घरांची पडझड झाली. तसेच सहा विजेचे खांब, विजेची डिपी व घराची पडझड झाल्याने जनावरांना दुखापत झाली. खांबाडा येथील अप्पाजी तुकाराम बाबुलकर, सुरेश शालिकराव चव्हाण, अंकुश दिगांबर वडस्कर, यांच्याही घरांची पडझड झाली. घरांचे टिनपत्रे उडून अंगावर पडल्याने अजय सुरेश चव्हाण, फुलाबाई वडस्कर, गौरुदास वडस्कर हे जखमी झाले. अनेक घरांचे छप्परे, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला.घटनेची माहिती होताच राजुऱ्याचे आमदार अॅड. संजय धोटे, तहसीलदार, पटवारी यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. एक तास चाललेल्या या वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
वादळाने अनेक घरांची पडझड
By admin | Updated: April 28, 2015 01:17 IST