स्वच्छता करणार कशी ? : अनेक पुतळे ५०-६० वर्ष जुने चंद्रपूर : लोकनेते मा. सा. कन्नमवार यांचा पुतळा कुणाच्या कक्षेत येतो, यावरून महानगर पालिकेची टोलवाटोलवी सुरू असतानाच, या शहरात नेमके किती पुतळे आणि किती स्मारके आहेत, याचा ठोस आकडाच महानगरपालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे महानगरपालिका नेमक्या कोणत्या सबबीवर पुतळ्यांची कक्षा ठरवित आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या पुतळयाच्या स्वच्छतेवरून महापौरांनी घेतलेल्या टोलवाटोलवीच्या भूमिकेनंतर ‘लोकमत’ चमूने शहरातील पुतळ्यांच्या अवस्थेचा आणि किती पुतळे आणि स्मारके आहेत, याचा शोध घेतला असता ही बाब निदर्शनास आली. या चमूने शहरात फिरून पाहाणी केली असता अनेक पुतळे आणि स्मारके स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी तर कितीतरी दिवसात स्वच्छता कर्मचारी आणि महानगर पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक फिरकले नाही की काय, अशी शंका येण्याईतपत वाईट स्थिती दिसून आली. या अनुषंगाने पुतळ्यांची माहिती घेण्यासाठी महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता संख्येबाबत कुणीही समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. सध्या माहिती नाही, फाईल उपलब्ध नाही, सर्व्हेक्षण करायचे आहे, अशी एक ना अनेक उत्तरे ऐकावयास मिळाली. प्रत्यक्षात खरा आकडा उपलब्ध होऊ न शकल्याने महानगर पालिकेकडे पुतळे व स्मारकांची नेमकी माहिती आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मुख्य मार्गावर आणि आझाद बागेत असलेल्या अशा मोजक्या पुतळ्यांची तोंडी माहिती वगळली तर महानगरपालिकडे कसलीही अद्ययावत माहिती दिसून आली नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी महानगर पालिकेची झोन कार्यालये शहरात उघडण्यात आली आहेत. या कार्यालयांमध्ये सर्व दस्तऐवज पाठविण्यात आल्याचे मनपाकडून सांगितले जाते. झोन कार्यालयाकडे विचारणा केली असता तिथेही कसलीही माहिती उपलब्ध झाली नाही. १६ जानेवारीला झालेल्या महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये काही सदस्यांनी मा.सा. कन्नमवारांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेसंदर्भात मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर महापौरांनी कसलेही भाष्य केले नव्हते. शहरात किती पुतळे आहेत याबद्दल नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौरांना सभेत विचारणा केली होती. त्यावरही कसलेच उत्तर देण्यात आले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)पुतळा व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित समाजाकडे द्यावी : मुनगंटीवारशहरातील पुतळे स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपासोबत सर्वांचीच आहे. मनपा यात मागे पडली. यावर उपाय म्हणून हे महापुरूषांचे पुतळे संबंधित समाजाकडे हस्तांतरित करावे आणि त्यांच्या व्यवस्थापनाची व स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्याकडे द्यावी, असा पर्याय वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुचविला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, कन्नमवारांच्या पुतळयाबाबत मनपाकडून घडले ते समर्थनीय नाही. मात्र यामुळे नागरिकांची जबाबदारी संपत नाही. केवळ वर्षातून एकदा येऊन अभिवादन करण्यासोबतच नियमित देखभाल करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. शांताराम पोटदुखेंनी घेतली पुन्हा दखलसरदार पटेल महाविद्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांनी पुन्हा या विषयाची दखल घेतली. ना. मुनगंटीवार यांना भाषणातून ते म्हणाले, पुतळा जिल्हा परिषदेचाच आहे. त्यांनी तो महानगर पालिकेला हस्तांतरित केला नाही. मात्र जबाबदारीतून कुणी सुटत नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सत्ता तुमचीच आहे. जबाबदारी घ्यायला जरा त्यांना सांगा, असा सल्ला त्यांनी दिला.
मनपाकडे पुतळ्यांचा रेकॉर्डच नाही
By admin | Updated: January 17, 2016 00:47 IST