लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता दिला जातो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना हा भत्ता देणे बंद करण्यात आले होते. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर अतिरिक्त भत्ता देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी पवन जोशी बिझनेस अॅनॅलिस्ट मुंबई यांना दिले आहे.
शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांनी दिली. मार्च २०२३ पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब कोणतेही कारण न देता राज्यस्तरावरून अचानकपणे बंद करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळणे बंद झाले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने शासन तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. यासंदर्भात राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर, जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा निवेदन मागणी लावून धरली. त्यानंतर चंद्रपूरचे सीईओ विवेक जॉन्सन यांनी आदिवासी प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅबसंदर्भात अंतिम अहवाल शासनाकडे पाठविला. अहवालाच्या अनुषंगाने शिक्षण संचालकांनी कार्यवाही करून ऑनलाइन टॅब सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिलेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने या प्रश्नासंदर्भात विशेष लक्ष घालून विषय निकालात काढल्याबद्दल परिषद पदाधिकारी राजेश सुर्वे, प्रकाश चुनारकर, विलास बोबडे, अमोल देठे, विलास खाडे, अजय बेदरे, संजय लांडे, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, सुशांत मुनगंटीवार, योगिनी दिघोरे, किशोर मुन, राजेंद्र पांडे, सतीश दुवावार, दिनेश टिपले, दिलीप राठोड, गणेश प्रधान, नरेंद्र चौखे, सतीश डांगरे, सुंदर धांडे, सुनील टोंगे, आनंदराव वेलादी, विजय नळे, तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
"जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च २०२३ पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता देणे बंद करण्यात आले होते. • यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन, पाठपुरावा करण्यात आला. यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याने आता शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे." - प्रकाश चुनारकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक