येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी महादेव शेवकर यांच्या शेतामध्ये अचानक आग लागून झोपडीसह ४० नग स्पिंकलर पाईप, फवारणी पंप, आब्यांची झाडे जळून खाक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित यंत्रणेने चौकशी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकरी महादेव शेवकर रा. पळसगाव याचे शेत तलाठी साजा कोठारी येथील गाव कवडजई येथे भुमापन क्रमांक २३१ असून आराजी क्षेत्र १.५० हे.आर आहे. या शेतामध्ये पक्की विहीर असून इलेक्ट्रीक मोटरपंप आहे. शेवकर हे या साधनाद्वारे धान व गहू या मुख्य पिकासोबत इतर पीक घेत आहेत. महादेव शेवकर हे १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी असल्यामुळे ते शेतात गेले नाही. दरम्यान दुपारी २ वाजता अचानक त्यांच्या शेतामध्ये आग लागली. याची माहिती मिळताच शेवकर यांनी शेतामध्ये धाव घेतली व पाहणी केली असता सर्व काही जळून खाक झाले होते.या घटनेत महादेव शेवकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पुढील हंगामही अडचणीत आला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने चौकशी करून मदत देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
आपादग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या
By admin | Updated: April 17, 2016 00:48 IST