लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा या सहा विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण ६२.४० टक्के टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोबरला संबंधित एसडीओ कार्यालयात मतमोजणी होणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७६ हजार ३५१ मतदार आहेत. त्यामध्ये नऊ लाख ६२ हजार ३७८ पुरुष मतदार तर नऊ लाख १३ हजार ९५१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात २२ तृतीयपंथी मतदार आहेत.सहाही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. रविवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी सकाळीदेखील ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सकाळच्या सुमारास फारसे नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत सहाही विधानसभा क्षेत्रात सरासरी केवळ ६.३७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंतही अशीच परिस्थिती होती. दोन-चार नागरिक केंद्रावर येत राहिले. ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १६.७९ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडू लागले. दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.५६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत ४२.३१ टक्के तर सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५५.८४ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६२.४० टक्के मतदान झाले.सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, अनेक केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी आल्या. मूल तालुक्यातील मौजा मरेगाव येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान सकाळी ८:१० वाजता सुरू झाले. नागभीड येथील मतदान केंद्र क्रमांक १३१ वर १४० मतदानानंतर मशीनमध्ये बिघाड झाला. मात्र लगेच नवीन मशीन लावण्यात आली. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा - जूनगाव येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ४५ मिनिटे मतदान बंद पडले होते. घुग्घूस येथील कॉलरी शाळा मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत मतदान पार पडले. मात्र त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. ४० मिनिटापर्यंत मतदान थांबले होते. त्यानंतर नवीन व्हीव्हीपॅट लावण्यात आले. चिमूर विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ३० ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आला होता.चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रियासोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्हा प्रशासनातील दहा हजार ६६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस प्रशासनातील चार हजार ४६६ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेकरिता तैनात केले आहे. यामध्ये १९५ पोलीस अधिकारी, दोन हजार ३८० पोलीस कर्मचारी, सात अर्धसैनिक दल, एक हजार २०० होमगार्ड, सी ६० दंगा नियंत्रण पथक दोन, एक बॉम्बशोधक पथक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर व वरोरा मतदार संघातील ७९ संवेदनशील मतदार केंद्राच्या परिसरात पोलीस पथकाने विशेष लक्ष ठेवले होते. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात अनोळखी व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांनी अशा केंद्रांवर वॉच ठेवण्यात आला होता.लोकसभेत बहिष्कार विधानसभेत मतदानचिमूर विधानसभा मतदार संघातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज व चिखलगावच्या नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा इतर गावांसोबत संपर्क तुटतो. गावकरी मुलाच्या मागणीसाठी आग्रही होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत दोन्ही गावातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra Election 2019 : मतदारराजाचा महाकौल मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:01 IST
सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोबरला संबंधित एसडीओ कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
Maharashtra Election 2019 : मतदारराजाचा महाकौल मशीनबंद
ठळक मुद्दे७१ उमेदवारांचा २४ ऑक्टोबरला फैसला : जिल्ह्यात ६२.४० टक्के मतदान