चंद्रपूर : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक संघटनांनी मिळून तयार केलेली जम्मू काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीतर्फे गुरुवारी बागला चौकातून महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्थांसह ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. सदर रॅली गांधी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबामार्गे गांधी चौकात आल्यानंतर विसर्जीत करण्यात आली.संकटात सापडलेल्या देशबांधवांना जिल्ह्यातून मदत पोहचावी या हेतून जम्मु काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने नागरिकांना मदत करण्याची विनंती करण्यात आली. यानंतर अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी सुपूर्द केला.गुरुवारी बागला चौकातून निघालेल्या रॅलीचा समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यानंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. सकाळी ७.३० वाजता निघालेल्या रॅलीचा समारोप गांधी चौकात सकाळी १०.३० वाजता करण्यात आला. समितीचे संयोजक अॅड. विजय मोगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेण्यात आली. यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, श्रमिक एल्गार, चेंबर आॅफ कॉमर्स, श्रमिक पत्रकार संघ, एमआयडीसी असोसिएशन, शिक्षक, प्राचार्य, डॉक्टर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी पूरग्रस्तांना मदत निधी दिला. (नगर प्रतिनिधी)
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघाली महारॅली
By admin | Updated: October 3, 2014 01:23 IST