दुर्गापूर: येथील एका प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने त्याला खाली उतरविण्यात आले. सध्या तो येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दुर्गापूर परिसरातील वॉर्ड नं. २ मध्ये घडली.दुर्गापूर येथील एकता चौक वॉर्डातील संतोष प्रल्हाद मेश्राम (२५) याचे उर्जानगर वॉर्ड क्रमांक ६ मधील एका युवतीशी मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. युवती संतोषच्या घरी अधून-मधून येत असल्याने परिसरातील नागरिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. गुरुवारी संतोषची आई आणि भाऊ बाहेर गेल्यानंतर त्याची प्रेयसी घरी आली. मात्र दोघांमध्ये शाब्दिल चकमक झाल्याने संतोषने तिच्यासमोरच ओढणीने गळफास लावला. तिने आरडाओरड केल्यानंतर नागरिक धावून आले. त्यानंतर संतोषला खाली उतरविण्यात आले. चिंताजनक अवस्थेत नागरिकांनी प्रथम त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यानंतर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तो मृत्युशी झुंज देत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना होताच नोंद घेतली आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता तो बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रेयसीसमोरच प्रियकराने घेतला गळफास
By admin | Updated: October 9, 2014 22:59 IST