कोरपना: वनखात्याची मंजुरी नसतानाही गडचांदूर वनक्षेत्रातील बांबेझरीच्या वनरक्षकाने दारिद्रय़रेषेखाली व इतरही आदिवासी बांधवांना स्वयंपाक गॅस जोडणी देण्याचे आमिष दाखवून चक्क २५ हजारांची लूट केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वनक्षेत्रालगत राहणार्या ग्रामस्थांनी सरपणासाठी जंगलतोड करू नये म्हणून शासनाने आदिवासी उपयोजनेअंतर्गत स्वयंपाक गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाकडून प्रति जोडणी ७५ टक्के राशी (६ हजार ७५८/-) दिली जाते. उर्वरित २५ टक्के राशी ही लाभार्थ्यांने भरायची असते. गडचांदूर वनक्षेत्रात गेल्या दोन वर्षात १८0 स्वयंपाक गॅस जोडणी पुरविण्यात आल्या. यामध्ये वरझडी, मनोली आणि नोकारी या तीन गावातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या गावालगत असलेल्या बांबेझरी येथील आदिवासी बांधवांकरिता शासनाकडून स्वयंपाक गॅसची मंजुरी मिळाल्याची बतावणी करून बांबेझरीच्या वनरक्षकाने २0 आदिवासींकडून २५ टक्के प्रमाणे प्रत्येकी एक हजार २00 ते एक हजार ५00 रुपये अवैधरित्या वसुली केल्याचा आरोप आहे. या आदिवासींनी अन् त्यातही दारिद्रय़रेषेखाली असणार्या बांधवांनी पदरमोड करून जमविलेली रक्कम तेथील वनरक्षकाने उकळली. दरम्यान, वर्ष लोटले तरी गॅस जोडणी मिळाली नसल्याने त्यांनी वनरक्षकास वारंवार विचारणा केली. मात्र थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जायची. अखेर या त्रस्त आदिवासी बांधवांनी नुकतेच गडचांदूर वनक्षेत्र कार्यालयात येऊन चौकशी केली असता, अद्याप मंजुरीच नाही तर कार्यक्रमही नसल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून वनरक्षकाने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. सध्या हे आदिवासी बांधव आपल्या राशी वसुलीसाठी वनरक्षकाकडे खेटा घालत आहेत. तर हा वनरक्षक नित्य नवी कारणे देत आपल्या बदलीची वाट बघत आहे. आता वरिष्ठ वन अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंपाक गॅस जोडणीच्या नावावर आदिवासींची लूट
By admin | Updated: June 2, 2014 01:03 IST