खडसंगी : युवा वर्गाच्या पसंतीचे साधन ठरलेले अॅन्डराईड मोबाईल, लॅपटाप व कॉम्प्युटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाची माहिती संगणकावर किंवा मोबाईलवरुन घेता येते तर याच मोबाईलवरील सोशल मीडिया फेसबुक, वॉटसअप या माध्यमातून एकमेकांसोबत क्षणार्धात संवाद साधता येतो. त्यामुळे या माध्यमाचा चांगला वापर केल्यास मानवाचे अनेक काम सुलभ होतात. मात्र याच ‘फेसबुक’ चा वापर युवकाकडून वाईट कामाकरिता करण्यात येत आहे. त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत असून अशा काही तक्रारीसुद्धा झाल्या आहेत. इंटरनेटवरुन बनावट फेसबुक बनवून गैरवापर करणाऱ्यावर चिमूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे फेसबुक व वॉट्सअपचा गैरवापर करणाऱ्यामध्ये तूर्तास खळबळ उडाली आहे.चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत बनावट नावाने फेसबुक अकाऊंट बनवून एका विद्यार्थिनीला त्रास देण्याच्या प्रकाराची तक्रार पोलिसात मागील चार महिन्याआधी करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण थंडबस्त्यात पडले होते. मात्र चिमूर शहरात नव्यानेच रुजू आलेले ठाणेदार मनीष ठाकरे यांनी हा तपास स्वत:जवळ घेत दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला व बनावट अकाऊंट बनवणारा उमरेड तालुक्यातील वेलसाखरा येथील नीलेश पानतावणे या युवकास अटक केली. आरोपीस अटक करण्याकरिता ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, प्रदीप करणवार, किशोर बोंड, मंगेश सिरसाट आदींनी परिश्रम घेतले.युवा वर्गामध्ये फेसबुक वर बनावट अकाऊंट तयार करुन गैरवापराचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याची दखल चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे यांनी घेऊन अशा फेस आयडीची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती ठाणेदार मनिष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. (वार्ताहर)
फेसबुक अकाऊंटवर पोलिसांची करडी नजर
By admin | Updated: June 27, 2015 01:38 IST