समितीकडून चौकशी पूर्ण : आठवडाभरात अहवाल सादर होण्याची शक्यताचंद्रपूर : जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. घोटाळ्याच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेली समिती आपला चौकशी अहवाल आठवडाभरात सादर करण्याची शक्यता असून या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बैलबंडी वाटप करण्यात आले. मात्र अनेक बैलबंडी वजनाने हलक्या होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अनुदानावर मिळालेल्या बैलबंडी भंगारात विकल्याचा प्रकार राजुरा तालुक्यात घडला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून वाटप करण्यात आलेल्या बैलबंडी कमी वजनाच्या असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्याकडे केल्या होत्या. जाधव यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. त्यानंतर अनेक सभांमध्ये बैलबंडी वाटपाचा मुद्दा गाजला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी बैलबंड्याची तपासणी केली. त्यानंतर तसा अहवालही जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला. मात्र कारवाई कोणतीही झाली. त्यामुळे बैलबंडी घोटाळ्याचे वादळ जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये सतत उठत राहिले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी बैलबंडी वाटपाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली. या समितीच्या अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, मोहिते, बोढाले, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे, अमर बोडलावार आणि संदिप गड्डमवार यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे घोटाळ्याचे वादळ काही दिवस शमले. मात्र वेगवेळ्या कारणांमुळे चौकशीचे काम थंडबस्त्यात पडले. त्यामुळे पून्हा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये घोटाळ्याचे वादळ उटणे सुरू झाले. सत्ताधारी आठ दिवस, दहा दिवसाचा अवधी मागून चौकशी लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन विरोधकांना दिले. अखेर या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. समितीने संपूर्ण जिल्ह्यात बैलबंडी वाटपाची चौकशी केली असून आता या समितीला लेखी चौकशी अहवाल द्यावे लागणार आहे. हा अहवाल आठवडाभरात सादर करणार असल्याची माहिती सुत्रानी दिली असून बैलबंडी वाटपात कोण दोषी आढळणार आणि दोषींवर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बैलबंडी घोटाळ्याच्या अहवालाकडे नजरा
By admin | Updated: February 28, 2016 01:05 IST