बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती : शेतकऱ्यांची गैरसोय थांबलीराजुरा : राजुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे व सावकारी कर्ज घेण्याची त्यांच्यावर पाळी येऊ नये, याकरिता तालुक्यातील विविध बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कर्ज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १ कोटी ९१ लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले.ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाकरिता अर्ज केले आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्यासाठी तहसील कार्यालय सभागृह राजुरा येथे पीक कर्ज मेळावा सोमवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे होते. जिल्हा मध्य. बँकेचे निरीक्षक जी.व्ही. रापर्तीवार, प्रबंधक निशिकांत घैसास, एन.बी. श्रीरामे, प्रकाश राजुरकर, प्रमोद सिंघल, राजेश कुमरे, अभिषेक रोहिला, मनोज सोनकुसरे, दुर्वेश तर्जुले, वरिष्ठ प्रबंधक वसंत दुर्योधन, यांची उपस्थिती होती.पीक कर्ज मेळाव्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी सोसायटी धोपटाळाकडून सहा सदस्यांना ३ लाख, सुमठाणा येथील ३७ सदस्यांना १८ लाख १७ हजार, विहीरगाव येथील ६१ सदस्यांना २१ लाख ५७ हजार, चिंचोली येथील ७१ सदस्यांना २८ लाख ३४ हजार, गोवरी येथील २३ सदस्यांना १६ लाख ८ हजार कर्जाचे धनादेश देण्यात आले. मेळाव्यात एकूण ३५४ सदस्यांना १ कोटी ९१ लाख ७८ हजार रुपयाचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले व ६ सभासदांचे ४ लाख ८६ हजार रुपयाचे पीक कर्जाचे पुर्नगठन करून देण्यात आले.खरिप हंगामाला सुरुवात होताच तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी तालुक्यातील सर्व बँकाच्या व्यवस्थापकांशी बैठक घेवून कोणत्याही शेतकऱ्याला पीक कर्ज घेताना अडचण भासणार नाही, याची दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)
राजुऱ्याच्या पीक कर्ज मेळाव्यात १ कोटी ९१ लाखांचे कर्ज मंजूर
By admin | Updated: June 22, 2016 01:16 IST