चंद्रपूर : उमेदवार व मतदारांना गेल्या आठ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरूवारी संपली. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ जागा भाजपाने जिंकून निर्विवाद स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ २० जागा जिंकता आल्या तर ३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचा पुरता सफाया झाला आहे. दोन्ही पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व आता बाद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समित्यांमध्येही सफाया झाला असून जिल्हाभरातून केवळ दुर्गापूर १ या पंचायत समिती क्षेत्रातून पंकज ढेंगारे हे एकटेच निवडून आले. तर १५ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांवर भाजपाला स्पष्ट बहुमत असून काँग्रेसला ४ पंचायत समित्यांवर बहुमत मिळाले आहे. सावली व जिवती या पंचायत समितीवर कॉंग्रेस व भाजपाचे सारखे सदस्य निवडून आले असून सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाचे उमेदवार दावा करतात, याकडे लक्ष राहणार आहे. यावेळेस सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढविल्याने सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा झाल्या. तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हान, विधानसभेचे उपगटनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी प्रचार सभा घेत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारून मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटी घेतल्या होत्या. मात्र निकालअंती चित्र स्पष्ट झाले आहे. गतवेळच्या तुलनेत यावर्षी भाजपाने जोरदार मुसंडी मारत ३३ जागा जिंकल्या. गतवेळी भाजपाला १८ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी भाजपाच्या १५ जागा वाढल्या आहेत. तर काँग्रेसने गतवेळच्या तुलनेत एक जागा गमाविली असून यावर्षी केवळ २० जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने गतवेळी ७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळेस खातेही उघडता आले नाही. तर शिवसेना, शेतकरी संघटना, बसपा, मनसेलाही गतवेळच्या तुुलनेत यावर्षी खातेही उघडता आले नाही. त्यामुळे या पक्षांचे जिल्हा परिषदेतील नेतृत्व पुर्णत: बाद झाले आहे. गुरूवारी सकाळी १० वाजतापासून प्रत्येक तालुका मुख्यालयी मतमोजणीला सुरूवात झाली. अर्धा-एक तासानंतर निकाल हाती यायला लागले आणि मतमोजणी केंद्र परिसर जल्लोषाने गजबजू लागले. मतमोजणी प्रक्रिया काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी सुरळीत पार पडली. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात कमळ फुलले रॉका, शिवसेनेसह इतर पक्षांचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 01:15 IST