राजुरा : ग्रंथालये ही समाज विकासाची माध्यमे असून ग्रंथसंपदेमुळे आदर्श नागरिक घडविता येतात. मात्र ही वाचन संस्कृती व चळवळ टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले. यावेळी रामनगर कॉलनीत ग्रंथालय निर्मितीकरिता वास्तू मंजूर करणार असल्याचेही ते म्हणाले.
राजुरा येथील रामनगर कॉलनीत नगर परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खुल्या रंगमंचाचे लोकार्पण आमदार धोटे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगरसेवक ॲड. सदानंद लांडे, ज्येष्ठ नागरिक प्रभाकरराव उपगनलावर, न.प चे शिक्षण सभापती राधेश्याम अडानिया, बांधकाम सभापती नगरसेवक हरजितसिंग सिंधू, स. गां. निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, नगरसेवक भटारकर उपस्थित होते. नगराध्यक्ष धोटे यांनी प्रास्ताविकातून विविध विकास कामांचा आढावा घेताना ‘सुंदर राजुरा स्वच्छ राजुरा’ हे ब्रीद असल्याचे सांगितले. संचालन कार्यालय अधीक्षक जांभूळकर यांनी तर आभार प्रा. डॉ. संजय गोरे यांनी मानले. याप्रसंगी कॉलनीतील ज्येष्ठ सदस्य सखाराम बोरकुटे, ॲड. प्रशांत अटाळकर, सतीश कुचणवार यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते.