मजुरांचे स्थलांतर : २ लाख ३५ हजार जॉबकार्डधारकांना कामाची प्रतीक्षामंगेश भांडेकर - चंद्रपूरबेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत केंद्र शासन शंभर दिवसाचे तर राज्य शासनाकडून ३६५ दिवस काम मिळवून देण्याची हमी आहे. मात्र, मजुरांकडून कामाची मागणी करुनही जिल्ह्यातील तब्बल ४१५ ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे बेरोजगार मजूरांना कामासाठी स्थलांतर व्हावे लागत आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील फक्त ४३२ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे केली जात आहेत. उर्वरीत ४१५ ग्रामपंचायतीत समाविष्ठ असलेल्या नागरिकांना काम मिळत नसल्याने शहरी भागात कामासाठी जावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्यांना कामाची गरज अशांनी कामाची मागणी केल्यानंतर ५० टक्के काम ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. ३० जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींपैकी ४३२ ग्रामपंचायतींमध्ये ९१२ कामे सुरु आहेत. या कामांमुळे फक्त १६ हजार ४४ मजूरांना काम मिळाला आहे. मात्र, अर्ध्या ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरु झालेला नाही. त्यामुळे जवळपास २ लाख ३५ हजार मजूरांना कामाची प्रतीक्षा करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ५१ हजारच्या जवळपास जॉब कार्डधारक मजूर आहेत. त्यांना काम मिळवून देण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, मजूर ग्रामपंचातीकडे कामाची मागणी करुनही काम सुरु झालेली नाही. खरीप शेती हंगाम संपताच काहींनी रबी पिकांची लागवड केली. मात्र, रबी हंगामाचेही कामे आता आटोपल्याने ग्रामीण भागात शेकडो मजूर कामाच्या शोधात असून महिला व पुरुष मजूर वर्ग मिळेल ते काम करण्यासाठी धडपडत आहेत.
४१५ ग्रामपंचायतींची रोहयोकडे पाठ
By admin | Updated: February 1, 2015 22:52 IST