चंद्रपूर : पक्षामुळे माणसे मोठी होतात हे खरे असले तरी, एकदा का माणसे मोठी झाली की काहींना पक्ष लहान दिसायला लागतो. यातून मग स्वत:चा स्वार्थ आणि आकसापोटी पक्षाला फटका बसत जातो. याचे उदाहरण सध्या ब्रह्मपुरीतील जनता पाहत आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपाचे विद्यमान आमदार एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकले आहे. निवडणूक अटीतटीची आहे. या अटीतटीच्या लढतीत सर्वांनी आपआपले तट सांभाळावे अशी पक्षाची अपेक्षा असते. मात्र या बाक्या वेळी काँग्रेसचे स्थानिक नेतेच पक्षविरोधी कारवाया करीत फिरत आहे. यामागे नेमका विरोध पक्षाचा आहे की व्यक्तीचा हा वेगळा भाग आहे. वैयक्तिक कारणामुळे ते असे करीत असले तरी यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अकारण संभ्रम निर्माण होत आहे. असा संभ्रम या निवडणुकांच्या नाजूक दिवसात होणे पक्षीय हिताचे नाही. ते त्यांना कळत असले तरी हा प्रकार थांबताना दिसत नसल्याने पक्षाचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. काँग्रेसचे चिमुरातील विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यावेळी ब्रह्मपुरीतून रणांगणात आहेत. त्यांना भाजपाचे विद्यमान आमदार अतुल देशकरांचे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवारही तिरंगी लढतीचे चित्र रंगवू पाहत आहे. वास्तविक, या क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी आहे. तरीही, ऐन निवडणुकीत होणाऱ्या पक्षविरोधी कारवायामुळे नेहमीच काँग्रेस अडचणीत येऊन भाजपाला फायदा होत आला आहे. अशोक भैय्या हे राजकीय क्षेत्रात काँग्रेसचे नेते म्हणून वावरतात. मात्र निवडणुका आल्या की त्यांची मानसिकता का बिघडते, हे अद्यापही कुणाला कळलेले नाही. निवडणुका आल्या की त्यांचा छुपा प्रचार सुरू होतो. त्यांचा असा छुपा प्रचार अनेकांनी अनुभवला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीही झाल्यात. मात्र वरिष्ठ गंभीर नसल्याने निवडणुकांच्या तोंडावर त्यांची मानसिकता बिघडणे सुरूच आहे. यावेळीदेखील त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले. भैय्या जबाबदार नेते आहेत. निदान जबाबदार माणसांकडून तरी अशी मानसिकता बिघडणे योग्य नाही, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
नेत्याच्या वैयक्तिक आकसाचा पक्षाला धोका
By admin | Updated: October 9, 2014 23:00 IST