उपासमारीची पाळी : पूर्वसूचना न देता कामावरून काढलेगडचांदूर: अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये २००७ पासून ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना फेब्रुवारी मार्च २०१५ पासून कंपनीने कोणतेही कारण न देता कामावरुन काढून टाकले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शेती होती, ती यापूर्वीच कंपनीने घेतली व आता रोजगारसुद्धा हिरावल्यामुळे पाच कामगारांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्पग्रस्त कामगारांनी यापूर्वी आंदोलन केले व कामावर परत घेण्याची मागणी केली. मात्र कंपनीने न्याय न दिल्याने अखेरचा मार्ग स्वीकारत ३ जूनपासून पाचही कामगारांनी कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.कंपनीने सत्यपाल किन्नाके (सोनापूर), विनोद मरस्कोल्हे (सोनापूर) , गणेश सातपाडे (गडचांदूर), प्रभाकर लखमापूरे (कुकुडसाथ), रविंद्र पंधरे (सोनापूर) यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या शेतजमिनी संपादन करताना जमिनीचा योग्य मोबदला व कायमस्वरूपी नोकरी देण्याचे कबूल केले होते. मात्र कंपनीने कायमस्वरूपी नोकरी न देता ठेकेदारीमध्ये काम दिले व तिथूनही कमी केल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. जीवन कसे जगावे या विवंचनेत ते आहेत. प्रकल्पग्रस्त कामगारांनी जिल्हाधिकारी, कामगार संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडे न्याय देण्याची विनंती केली. मात्र निराशाच झाली व अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग कामगारांनी स्वीकारला आहे.कंपनी व्यवस्थापनाने पाचही कामगारांना तात्काळ पूर्ववत कामावर घ्यावे, काम बंद झाल्यापासून गुजरान भत्ता द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त कामगारांनी केली आहे. कामगारांची ही मागणी रास्त असल्याने लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी कामगारांची आहे. (वार्ताहर) कंपनीकडून दखल नाहीकंपनीकडून प्रवेशद्वारासमोर प्रकल्पग्रस्त कामगारांनी ३ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनीच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही व समस्या जाणून घेतल्या नाही. प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी प्रकल्पग्रस्त कामगारांची इच्छा आहे.
प्रकल्पग्रस्त कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु
By admin | Updated: June 5, 2015 01:11 IST