सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विचोडा (बु.) येथे उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे व गावातील समाज भवनाचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.चंद्रपूर नजीकच्या विचोडा येथे गावाच्या काही भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या माध्यमातून ८२.३२ स.घ.मी.पाणी साठा अपेक्षित असून ४९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. विचोडा बु.येथील शेतक-यांच्या मागणीनुसार हा बंधारा बांधण्यात आला आहे. याच गावात १२ लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्यात आले आहे.या लोकार्पण कार्यक्रमात ना. मुनगंटीवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असून या व्यवस्थेतील एक छोटा कार्यकर्ता म्हणून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आपण कार्य करु शकत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. गावामध्ये बांधण्यात आलेल्या समाज भवनामध्ये सामाजिक स्वास्थ्याचे चिंतन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवारामार्फत सुजलाम, सुफलाम शेती करण्याचे सरकारचे ध्येय असून आनंदी गांव व आनंदी समाज निर्माण करण्याचे प्रयत्न मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे या गावातील लोकांकडून जलयुक्त शिवार सारख्या कामासाठी उत्तम प्रस्ताव आल्याने आज बंधारा उभा झाला आहे.या बंधाऱ्याच्या काठावर आणि गावातल्या प्रत्येक रस्त्याशेजारी या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत विचोड्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती ब्रीजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, जिल्हा परिषद सदस्यर वनीताताई आसुटकर, रंजीत सोयाम, गावाच्या सरपंच किरण डोंगरे, नामदेवराव डवले, विकास जुमनाके आदी उपस्थित होते.
विचोडा येथील बंधारा व सभागृहाचे लोकार्पण
By admin | Updated: May 28, 2017 00:45 IST