कोरपना : येथे तालुक्याची निर्मिती होऊन ३० वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटला. मात्र या ठिकाणी अनेक विभागाची उपविभागीय कार्यालये नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
यामध्ये उपविभागीय अधिकारी महसूल,
जिल्हा परिषदेचे सिंचाई, पाणीपुरवठा, पाटबंधारे राजुरा येथे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग गडचांदुर येथे तर उपविभागीय पोलीस अधिकारी नांदाफाटा येथे स्थानापन्न आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कामे एकाच ठिकाणी होत नाही. त्यांना इकडून तिकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे महसूल, सिंचाई, पाटबंधारे, पाणीपुरवठा उपविभागाची स्वतंत्र निर्मिती करून गडचांदूर, नांदा येथील कार्यालये कोरपना येथे स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र याबाबत अनेकदा लक्ष वेधूनही लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरपना येथे तालुका पातळीवरील सर्वच विभागाची कार्यालये आहे. मात्र ही कार्यालये नसल्याने तालुक्यातील नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे.