शासकीय दूध डेअरी डबघाईस : सावधान ! खुल्या बाजारातील दुधात भेसळ होण्याची शक्यतासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरदुग्ध संस्थाची उदासीनता, पशुंची घटती संख्या आणि दूध विक्रीसाठी असलेली खुली बाजारपेठ यामुळे शासकीय दूध डेअरीमधून आता दूध मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. मोठा आटापिटा करून शासकीय दूध डेअरी दररोज ११ ते १२ हजार लिटर दूध नागरिकांपर्यंत पोहचवत आहे. दररोजची दुधाची गरजही पूर्ण करू शकत नसल्याने कोजागीरीला मागणी वाढली असतानाही दूध आणायचे तरी कुठून, असा प्रश्न येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे. याचाच फायदा खासगी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला मिळणार आहे. तर खुल्या बाजारामध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे.येथील शासकीय दूध डेअरील मध्ये गोंदिया तसेच कोहमारा येथील दूध संकलन आणि शितकेंद्रामधून दुधाचा पुरवठा केला जातो. गोंदिया येथून दोन दिवसाआड १० हजार लिटर तर कोहमारा येथून ४ हजार लिटर दूध आणल्या जाते. नागभीड येथून दिवसाआड दोन हजार लिटर दूध आणण्यात येत आहे. चंद्रपूर शहरासाठी १५ हजार लिटर दररोज दुधाची मागणी आहे. मात्र तडजोड करून केवळ १० ते १२ हजार लिटरपर्यंतच दूध पुरवठा केला जात आहे. ट्रान्सर्पोटिंग खर्च परवडण्यासारखा नसतानाही ही जोखीम शासकीय दूध डेअरी उचलत आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथील दुग्ध संस्थेमधून केवळ ३० ते ३५ लिटर दुध मिळत आहे. कोजागिरीला दुधाची मागणी वाढते. ही मागणी लक्षात घेता येथील दूध डेअरीने प्रादेशिक कार्यालयाकडे ३० हजार लिटर दूध ५ आॅक्टोंबरपर्यंत पाठविण्याची विनंती केली आहे. यासाठी त्यांनी वरिष्ठांना पत्रही लिहीले आहे. मात्र राज्यातील बहुतांश शासकीय दुध संकलन केंद्रांमध्ये दूधच उपलब्ध नसल्याने येथेही दूध उपलब्ध होऊ शकले नाही.शासकीय दूध डेअरीमध्ये दुध नसल्याने नागरिकांना खासगी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या दुधावर कोजागिरी साजरी करावी लागणार आहे. यात मात्र खिशाला कात्री लागणार आहे. तर खुल्या बाजारात मिळणाऱ्या दुधात भेसळ होण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्याने दुधाचा दर्जा राहीलच याचीही शाश्वती नाही. खासगी कंपन्या डबाबंद दूध तसेच दूध भुकटीच्या माध्यमातून नागरिकांची दुधाची मागणी पूर्ण करू शकते.
कोजागिरीला १८ हजार लिटर दुधाची कमतरता
By admin | Updated: October 6, 2014 23:08 IST