मिंडाळा राईस मिलजवळची घटना
नागभीड : तालुक्यातील मिंडाळा येथील एका राईस मिलच्याजवळ तारेच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सदर बिबट्याचा मृत्यू न्यूमोनियाने झाला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गभणे यांनी वर्तविला आहे.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास वासाळा मेंढा येथील काही मुले राईस मिलजवळ असलेल्या बोरीच्या झाडात बोरे खाण्यासाठी गेले असता तारेच्या कुंपणाच्या बाजूला बिबट दिसून आला. बिबट दिसताच मुले घाबरून सैरावैरा पळाली. मुले का पळत आहेत म्हणून मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांनी चौकशी केली असता मुलांनी बिबट्याविषयी माहिती दिली. लागलीच खात्री करण्यासाठी हे मजूर घटनास्थळाकडे गेले असता खरोखरच बिबट मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. लागलीच वनविभागाला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली व पंचनामा केला. मृत बिबट हा एक-दीड वर्षाचा आहे. पशुधन विभागाच्या सहायक आयुक्त डाॅ. अस्मिता जगझापे, पशुधन विकास अधिकारी डाॅ. गिरिश गभणे, डाॅ. शिरीष रामटेके यांच्या चमूने या बिबट्याचे शवविच्छेदन केले. यावेळी मानद वन्यजीव संरक्षक विवेक करंबेळकर, झेपचे अध्यक्ष पवन नागरे उपस्थित होते. येथील वनवसाहतीत या बिबट्यावर दहन संस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक आर. एम. वाकडे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. बिबट्याचे काही अवयव नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.