परिमल डोहणे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बालपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण. त्यातही देशसेवेची प्रबळ इच्छा. म्हणूनच पोलीस विभागाची नोकरी स्वीकारली. पण, गोड आवाज स्वस्थ बसू देत नव्हता. विविध कार्यक्रमातून गाणे सुरूच होते. दरम्यान, सोशल मीडियावर गाणे ऐकून रसिकांनी त्यावर पसंतीची मोहोर उमटविली. फेसबुकवर दररोज एक गाणे अपलोड करण्याचा आग्रह धरला. बघता-बघता खाकी वर्दीतील या सुरेल आवाजाचे लाखो चाहते तयार झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावतानाच गायकी जोपासणाºया या कलावंताचे नाव पूजा पारखी-जाधव.पूजाचा जन्म चंद्रपूरातच झाला. वडिल व्यवसायाने टेलर. गाण्याचा वारसा कुटुंबातूनच मिळाला. पूजाचे आजोबाही तन्मयतेने गायचे. नातवंडांना घेऊन दररोज भजन, कीर्तन गायचे. यातून पूजाला गाण्याची आवड निर्माण झाली. बालपणापासूनच ती सुरेल गाऊ लागली. जनता कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पूर्ण केले. शाळा-महाविद्यालयातही तिची गायकी बहरतच गेली. एफ.ई. एस. गर्ल्स कॉलेजमधून संगीत विषयात बी.ए. करताना पोलीस विभागात नोकरी मिळविली. प्रशिक्षणामुळे संगीत शिक्षण अर्धवट राहिले. मात्र, संगीत आराधना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. दरम्यान, मुंबई येथे ग्राफिक डिझायनर सुमित जाधव यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. सासरच्या मंडळींनी कलेला प्रोत्साहनच दिले. नव्या जोमाने गाऊ लागली. पूजाने संगीत रजनीमध्ये गाऊ लागली. पुरस्कारही मिळविले. पोलीस नायक अभिजित मुडे यांनी सर्वप्रथम फेसबुकवरील गाण्याला पसंती दिल्यानंतर चाहत्यांची संख्या वाढतीवर आहे. आता चाहते दररोज तिच्याकडून नव्या गाण्याची अपेक्षा ठेवत आहे. पूजाही विविध आशयसंपन्न गाणी फेसबुकवर अपलोड करीत करून ही मागणी पूर्ण करीत आहे.ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे. त्यामध्येच करिअर करावे. नेहमी नव्या संधीच्या शोधात असले पाहीजे. कला-संस्कृतीच्या सहवासातून मानवी जीवन समृद्ध होते. त्यामुळे युवा पिढीने स्वत:च्या आवडी-निवडी लक्षात घेवून आयुष्याला आकार देण्यातच खरी प्रगती आहे.- पूजा पारखी-जाधव.
खाकी वर्दीतील सुरेल आवाजाने रसिकांना वेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:47 IST
बालपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण. त्यातही देशसेवेची प्रबळ इच्छा. म्हणूनच पोलीस विभागाची नोकरी स्वीकारली. पण, गोड आवाज स्वस्थ बसू देत नव्हता. विविध कार्यक्रमातून गाणे सुरूच होते.
खाकी वर्दीतील सुरेल आवाजाने रसिकांना वेड
ठळक मुद्देकर्तव्यासोबतच सूर साधना : पूजाच्या गीतांची धूम