आंदोलन तूर्त स्थगित : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने बैठकलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : स्थानिक माजरी येथील नागलोन खुली कोळसा खाण-२ येथे पाटाळा, नागलोन, पळसगाव व शिवजीनगर येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना वेकोलिने ३० जूनपर्यंत नियुक्ती देण्यास लेखी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि वेकोलि प्रशासनाची मंळवारी बैठक झाली. त्यात नियुक्तीचे आश्वासन मिळाल्यावर प्रकल्पग्रस्तांनी तूर्त काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.पाटाळा, नागलोन, पळसगाव व शिवजीनगर येथील उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नोकरीत सामावून न घेतल्याने गेल्या तीन दिवसांपासून सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. या कालावधी महिला मोठ्या संख्येने कोळसा खाणीत ठाण मांडून बसल्या होत्या. तीन दिवसांपासून खाणीतील कोळसा उत्पादन बंद असल्याने वेकोलिचे ४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले होते. त्यामध्ये वेकोलिला १५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वेकोलिच्या माजरी खाण प्रशासनाने तीन दिवसांपासून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना तोडगा काढण्यात यश आले नाही. जिलाधिकारी आशुतोष सलील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. यावेळी वेकोलिचे नागपूर येथील अधिकारी घोष व परांजपे, जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, वेकोलिचे माजरी येथील महाप्रबंधक एम. येलय्या, प्रहार संघटनेचे बाळकृष्ण जुआर, अमोल डुकरे, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी आणि प्रकल्पग्रत संदीप झाडे, लिलेश ढवस, रामू डोंगे आदी उपस्थित होते. यावेळी वेकोलि प्रशासनाने उर्वरित सर्वच प्रकल्पग्रस्तांना ३० जूनपर्यंत सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच यावेळी न्यायालयात प्रलंबित व अल्पवयीन वगळता उर्वरितांना नियुक्ती देण्याचे मान्य करण्यात आले आहे.वेकोलिच्या लेखी आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी ३० जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे ठरविले आहे. तोपर्यंत वेकोलि प्रशासनाने कार्यवाही न केल्या पुन्हा खाणीचे काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे बजावण्यात आले. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदीप झाडे यांच्यासह रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल्ल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मीराबाई ढवस यांनी आंदोलन केले.तीन बैठका महत्त्वपूर्ण मंगळवारच्या बैठकीपूर्वी तीन ठिकाणी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या. वेकोलिच्या नागपूर येथील मुख्यालयी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी बैठक घेऊन प्रकल्पग्रतांना नियुक्त देण्याचे निर्देश दिले. दुसरी बैठक माजरी येथे वेकोलिच्या अधिकाकाऱ्यांनी घेतली. परंतु त्यात काही मार्ग निघाला नाही. त्यानंतर जिलाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मंगळवारी झालेल्या बैठकीत काम बंद आंदोलन ३० जूनपर्यंत स्थगित करण्यात आले.
३० जूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकरी
By admin | Updated: May 17, 2017 00:38 IST