मूलभूत सुविधांचा अभाव: संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी , पालकमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे. यासोबतच अन्य आवश्यक सुविधांचाही येथे मोठा अभाव आहे. या समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.जलनगर वॉर्ड मागील ४० वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे. या वॉर्डातील नागरिकांमधील बहुतांशी नागरिक हे दोरिद्र्यरेषेच्या अंतर्गत येतात. मात्र त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या वॉर्डात पाण्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासोबतच सांडपाणी नियोजन, कचरा संकलन, मलनिस्सारण या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फूटलेली आहे. यामुळे पाण्याची गळती होऊन प्रदूषित पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते. तसेच घनकचरा नियोजनही थंडबस्त्यात आहे. परिसरात हा कचरा टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक घरात मलेरिया, टायफाईड, डेंग्यू, चिकूनगुण्या असे आजार पसरत आहेत. ही समस्या गंभीर असून, महापालिका प्रशासन तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे.शिष्टमंडळामध्ये समितीचे अध्यक्ष रवींद्र छबू वैरागडे, विनोद घाटे, मंगेश बेले, चंद्रकांत बोरीकर, अमित वैरागडे, दिलीप घाटे, कल्पना शिंदे, अर्चना ईटनकर, मीना लाखंडे, वर्षा बनकर, सारिका चौधरी, हर्षा साठोणे, रुक्साना शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
जलनगर बनले समस्यांचे माहेर घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:38 IST