जलसाठ्याचा वन्यप्राण्यांना फायदा : चंदनसिंह चंदेल यांची उपस्थितीबल्लारपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील इटोली येथील कक्ष क्रमांक ५२१ मध्ये एका नाल्यावर जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिमेंटचा बंधारा बांधण्यात आला. या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. येथील जलसाठ्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झाली असून वन्यजीव गावात शिरकाव करणार नाही.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर, मध्यचांदाचे विभागीय वनाधिकारी बडगीलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वडेट्टीवार, बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजंगराव गजभे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले, जलशिवार योजनेमुळे पाणी साठवणूक व्यवस्थापन चांगले झाले आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे गावालगतच्या शेतीला सिंचनाची सोय झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. यामुळे वन्यप्राणी व मानवी संघर्षाची स्थिती निर्माण होते. भविष्याचा वेध घेताना अन्य ठिकाणीही सिमेंट बंधारे बांधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)
इटोली येथे जलशिवार योजनेचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 02:53 IST