२६ टीसीएम पाणीसाठा : शिवारात १३ बोडींचे नूतनीकरण चंद्रपूर : जिल्हयात ठिकठिकाणी असलेल्या बोडींमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ साचल्याने त्यातील पाणी अल्पप्रमाणावर साचत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानास प्रारंभ केल्यानंतर जिल्ह्यातील बोडी नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आलीत. त्यानुसार, गोंडपिपरी तालुक्यातील एकट्या चेकपिपरी शिवारात १३ बोडींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून ५२ हेक्टरचे सिंचन होणार आहे. गोंडपिपरीपासून २० किलो मीटर अंतरावर चेकपिपरी असून तेथे ठिकठिकाणी बोडी आढळून येतात. पावसाचे पाणी बोडीत साठवून आवश्यकतेप्रमाणे पिकास उलपब्ध करुन देण्यासाठी त्या फार उपयुक्त ठरतात. परंतु शिवारातील बहुतांश बोडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असल्याने फार कमी पाणी त्यात साचत होते. त्यामुळे सिंचनासाठी बोडींचा उपयोग अल्प प्रमाणात होत होता. जलयुक्त शिवार अभियान सुरु झाल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने चेकपिपरी परीसरातील ३० बोडींच्या नूतनीकरणातंर्गत खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या बोडींमध्ये आता मुबलक प्रमाणात पाणी साचत आहे. ते हक्काचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे. आनंद बाजीराव मेश्राम यांचे अडीच एकर शेतात दरवर्षी धानाचे पिक घेतात. या जमिनीत गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ३० पोते धान झाले होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध असती तर याच्या दुप्पट धान झाला असता, असे त्यांनी सांगितले. यावर्षी मात्र पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत धानाचे अधिक उत्पादन होणार आहे. धानाचे पिकानंतर हरभरा, लाखोळी या सारखे दुसरे व तिसरे पीकही बोडीत साचलेल्या पाण्यामुळे घेणार असल्याचे शेतकरी मेश्राम यांनी सांगितले. मेश्राम यांच्या शेतातील विहिरीत मर्र्यादित जलसाठा असल्याने उन्हाळयात सिंचनासाठी तो उपयोगी पडत नव्हता. त्यामुळे रबी व उन्हाळी पीक घेता येत नव्हते. खरिपाच्या हंगामातही पाणी द्यावयाचे असल्यास डिझल इंजिनव्दारे पाण्याचा उपसा करावा लागत होता. बोडीतील पाण्यामुळे विहिरीवर डिझल इंजिन लावण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) १०० टक्के अनुदानावर बोड्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे १०० बाय ३० या आकाराच्या व दोन मीटर खोलीच्या बोड्या आहेत. कृषी विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर या बोड्या करुन देण्यात आल्या होत्या. १३ बोडींचे नूतनीकरण झाल्याने परिसरात ५२ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. त्या बोडींमध्ये २६ टीसीएम पाणीसाठा जमा झाला आहे.
चेकपिंपरीत बोडी नूतनीकरणातून ५२ हेक्टरचे सिंचन
By admin | Updated: August 3, 2016 01:53 IST