घुग्घूस : रुग्ण येऊन असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी जाणारी आरोग्यसेविका तसेच सुटी नसतानाही विद्यार्थ्यांना सुट्टी देवून शाळेला कुलूप लावणाऱ्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. सदर कारवाई मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी केली. या कारवाईमुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात सुरळीतपणा येईल, अशी आशा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.मुख्य कार्र्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी घुग्घूस येथे आकस्किम भेट देत शासकीय कार्यालय तसेच शाळा,रुग्णालयाची तपासणी केली. या तपासणीमध्ये रुग्णालयाला कुलूप लावून असल्याचे त्यांना दिसले. त्याचवेळी प्रसुतीसाठी रुग्णालयात एक महिला उपचारासाठी ताटकळत होती. हा संतापजनक प्रकार बघताच सलिल यांनी तत्काळ आरोग्यसेविकेला निलंबित केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी शासकीय सुटी नसतानाही मुख्याध्यापकाने शाळेला सुटी दिल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनाही निलंबित व्हावे लागले. त्यानंतर भूमिगत गटार योजनेंतर्गत नाली बांधकाम, तलावातील घाणीचे साम्राज्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाहणी केली. यावेळी महिला शौचालयाची स्वच्छता नसल्याचे आढळून आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय क्वार्टर असतानाही कर्मचारी तिथे राहत नसल्याचे यावेळी नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.(वार्ताहर)
कामात अनियमितता, दोन कर्मचारी निलंबित
By admin | Updated: August 3, 2014 00:00 IST