पाण्याअभावी हाल : अनेक वॉर्डात नळाला पाणीच नाहीसिंदेवाही : मागील काही महिन्यापासून सिंदेवाहतील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिंदेवाहीमध्ये २५ हजार लोकसंख्या असून पाण्याण्याच्या तीन टाक्या आहेत. उमा नदीला भरपूर पाणी आहे. पण सिंदेवाहीतील जनता मात्र तहानलेलीच असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सिंदेवाहीला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पूर्वीच्या ग्राम पंचायतची व आता नगर पंचायतची आहे. काही दिवसांपासून नगरातील दोन- तीन वार्ड सोडले तर जवळपास सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. दसरा चौक, शिक्षक कॉलनी, मार्कण्डेय मंदिर, गणेश वॉर्ड, भारतमाता चौक, हनुमान मंदिर, शास्त्री चौक, राममंदिर परिसरातील वार्ड आदी भागात नळाद्वारे अतिशय कमी पाणीपुरवठा केला जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. पाणीपुरवठा करणारे नगर पंचायत कर्मचारी पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाहीत. तसेच राम मंदिर जवळील पाण्याची टाकी लिकेज असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. सिंदेवाही नगराला आंबोली व कळमगाव येथील उमा नदीवरुन पाणीपुरवठा होतो. मोटारपंप जळणे, विद्युत बिल न भरणे, पाईपलाईन फुटणे, जलशुद्धीकरण यंत्रामध्ये बिघाड झाला. अशा प्रकारे विविध कारणे नगर पंचायतमधून सांगितली जात आहेत. तसेच काही ठिकाणी पाईप लाईन जोडण्यात आली नाही. तर काही ठिकाणीे व्हॉल कमी-जास्त करण्यात आले आहे. कधी-कधी गावातील राजकारणाचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. हा चिंतेचा विषय बनला आहे. आठवड्यातून दोन- तीन दिवस येथील नळाला पाणी येत नाही. घरगुती नळाला पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आल्या आहेत. परंतु नगर पंचायतचे कर्मचारी गावात पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. नगरात दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. (पालक प्रतिनिधी)
सिंदेवाहीतील पाणीपुरवठा अनियमित
By admin | Updated: November 9, 2016 01:56 IST