पेंढरी (कोके) : राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेत १०० टक्के उपस्थिती असावी, याबाबतचे प्रधान सचिवांनी पत्र निर्गमित होताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रमेश नान्ने यांच्या नेतृत्त्वात ११ जुलैला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांची भेट घेऊन विविध समस्यांचे लेखी निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी आमदारासह संघटनेला बैठकीचे निमंंत्रण दिले आहे.शासकीय/अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर यांच्या विविध समस्या,एका वर्गात १५ ते २० निवासी पटसंख्या करणे, शिष्यवृत्ती परत सुरू करणे, १०० टक्के उपस्थिती, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करणे, प्रत्येक वर्गात ७५ टक्के आदिवासी व ७५ टक्के इतर विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांचा बुद्धांक वाढण्यासाठी प्रवेश देणे इत्यादी बाबतचे लेखी निवेदन शिक्षक आमदार नागो गाणार यांना देवून चालु अधिवेशनात समस्या मार्गी (लक्षवेधी) लावण्याची विनंती संघटनेने केली होती. त्यानुसार आमदार नागो गाणार यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून समस्या मार्गी लावण्याची विनंती करताच आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी अधिवेशत संपताच आदिवासी कर्मचारी संघटनेशी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थितीचा धसका घेऊ नये, असे आवाहन संघटनेने केले आहे. लवकरच या पत्रावर चर्चा होणार असून आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर तोडगा काढला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
आदिवासी मंत्र्यांचे शिक्षक संघटनेला बैठकीचे निमंत्रण
By admin | Updated: July 31, 2015 01:31 IST