पंचायत समितीच्या बैठकीत मुद्दा : बोगस प्रमाणपत्रावर दोन कोटींची उचलसावली : कंत्राटदाराचे बोगस प्रमाणपत्र सादर करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयाची उचल करणाऱ्या बोगस कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे निर्देश पंचायत समितीच्या आढावा बैठकीत आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले.पेंढरी येथील बोगस कंत्राटदार सुशील नरेड्डीवार याने तालुक्यातील चारगाव, बेलगाव, बोथली, पालेबारसा, उसरपारचक, पेंढरी आदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १३ व्या वित्त आयोग अंतर्गत अनेक कामे केली. काही कामे पूर्ण झाली तर काही कामे अपूर्ण आहेत. परंतु, कामाच्या बिलाची पूर्णपणे रक्कम उचल केली आहे. येथील कार्यकर्ता मोरेश्वर उद्योजवार यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, त्यांना सुशील नरेड्डीवार याच्याकडे कंत्राट घेण्याचे कोणतेही तांत्रीक शिक्षण नाही तसेच त्यांच्याकडे असलेले प्रमाणपत्र, हे बोगस असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचायत समिती सावली येथे झालेल्या आढावा बैठकीत तक्रार करण्यात आली. आ. वडेट्टीवारांनी या बोगस कंत्राटदारावर व त्याला सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या. आढावा बैठकीला पंचायत समितीच्या सभापती चंदा लेनगुरे, उपसभापती मंगला चिमड्यालवार, जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनुरवार, वैशाली कुकडे, माजी सभापती राकेश गड्डमवार, पंचायत समिती सदस्य अविनाश पाल, धर्माजी सिडाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिवराज शेरकी, उपसभापती आनंदराव शेरकी, संवर्ग विकास अधिकारी आशा ढवळे आदी उपस्थित होते. आढावा सभेत विविध विषयांचा आढावा घेऊन चर्चा झाली. (तालुका प्रतिनिधी)
बोगस कंत्राटदारावर कारवाईचे आमदाराकडून निर्देश
By admin | Updated: December 3, 2015 01:25 IST