चंद्रपूर : परिसरातील ग्रामीण भागातील अशिक्षितांना प्रौढ शिक्षण देण्याच्या अनुषंगाने इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी एक महिने प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात बाराखडीची ओळख, वाचण, लेखन आदींचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ४० जणांना सहभाग घेतला होता.आजही आपल्या देशात अनेकजण अशिक्षित आहेत. लॉकडाऊनमध्ये अशिक्षीत लोकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागले. ठेकेदारांकडे काम करणाऱ्या मजुरांचा अशिक्षितपणाचा फायदा घेवून लुबाडणूक करण्यात येत असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी अशा अशिक्षित लोकांना शिक्षण देवून सुशिक्षित करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनेकांनी याकडे कानाडोळा केला. त्यावेळी क्लबतर्फे त्यांना आमिष देवून शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही कालावधीत त्यांना रुची निर्माण झाली. एक महिन्यातील स्वत:चे नाव लिहीण्यास शिकले आहे. शासनाने याकडे लक्ष देवून प्रौढ शिक्षणांसाठी पूर्वीप्रमाणे उपक्रम राबवावे, अशी मागणीही या क्लबकडून करण्यात आली. प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना प्रमाणात व मिठाई देण्यात आली. या उपक्रमात डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, सचिव शकुंतला गोयल, सीसी उमा जैन, पुनम कपूर, जीनी गर्ग आदी उपस्थित होते.
प्रौढ शिक्षणासाठी इनरव्हिल क्लबचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST