शरद पाटील : भद्रावतीत वेगळ्या विदर्भावर मार्गदर्शनभद्रावती : अलीकडे जागृत नागरिक व विविध संघटनाकडून होत असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी लक्षात घेता विरोधकही वेगळा विदर्भ झाल्यास कसे नुकसानकारक आहे, असे समजावत आहे. परंतु आता स्वतंत्र विदर्भ समर्थकांनी चुकीच्या माहितीला बळी न पडता सत्य व वास्तव समजून वेगळा विदर्भ आंदोलन करून विदर्भावरील अन्याय संपविला पाहिजे, असे विचार नागपूर येथील शेतकरी नेते प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केले.ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ, पालक संघ, युगपुरूष स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, रोटरी क्लब व स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्याद्वारे आयोजित कोजागिरी उत्सवात पीपीटीद्वारे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे होते. मंचावर जनमंच नागपूरचे पदाधिकारी अभिताभ पावडे, विदर्भ प्रचारक राम आखरे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्रा. विवेक सरपटवार, राजू बोरकर, महेंद्र माणुसमारे, प्रवीण महाजन, भाविक तेलंग, सुनिता खंडाळकर, योगेश मत्ते, रवींद्र तिराणिक, अॅड. भूपेंद्र रायपुरे, नागसेन पाझारे, अविनाश सिधमशेट्टीवार, प्रदीप बंग आदी उपस्थित होते. पीपीटीद्वारे मार्गदर्शन करताना प्रा. पाटील यांनी विदर्भ राज्यावर होत असलेला अन्याय आकडेवारीसह समजावून सांगितला. या व्याख्यानात त्यांनी वेगळा विदर्भ होणे काळाची कशी गरज आहे, हे सविस्तर समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सरपटवार, संचालन डॉ. यशवंत घुमे व आभार राजू देवगडे यांनी मानले. यावेळी शहरातील व परिसरातील ७०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. तसेच संत गाडगेबाबा प्रबोधन मंडळ, अ.भा. ग्राहक पंचायत, पतंजली योग केंद्र, भद्रावतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
विदर्भावरील अन्याय संपविला पाहिजे
By admin | Updated: October 25, 2016 00:42 IST