फोटो
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्या शाखेअंतर्गत विविध विषयातील कार्यरत असलेल्या संशोधन केंद्रावर संशोधक विद्यार्थ्यांची संख्या आणि सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढवण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली असून यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना निवेदन दिले आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रात कार्यरत असलेले व नागपूर विद्यापीठामध्ये आचार्य पदवीचे मार्गदर्शक असणाऱ्या सर्व प्राध्यापकांना गोंडवाना विद्यापीठाने ही समांतर आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाने आपल्या दिशादर्शक निकषाप्रमाणे इतर पात्र प्राध्यापकांनाही आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये विविध विषयांअंतर्गत गाईडची संख्या वाढलेली आहे. मात्र संशोधन केंद्रावर केवळ दोन सहयोगी मार्गदर्शकांची नियुक्तीचा निकष असल्याने अनेक आचार्य पदवीचे मार्गदर्शक केवळ गाईड म्हणून नावापुरतेच उरले आहेत. त्याचप्रमाणे संशोधन केंद्रावर प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने संशोधनासाठी अनेक पात्र विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रावर प्रवेश घेता येत नाही. तसेच सहयोगी मार्गदर्शकांची उपलब्धता पण होऊ शकत नाही. या जाचक अटीमुळे या परिक्षेत्रातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे त्यामुळे विविध विषयात कार्यरत संशोधन केंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या व सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. विवेक गोरलावर, उपाध्यक्ष डॉ.राजू किरमिरे, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते यांनी केली आहे.