दुचाकी वाहनांचा लिलाव करा
चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आले आहेत. मात्र अनेक वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेली नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहे. त्यातील अनेक वाहने भंगार झाली असून काहींचे सुटे भाग बेपत्ता झाले आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडेल.
रस्त्यावरील झुडपे छाटण्याची मागणी
चंद्रपूर: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता आहे. सावली तालुक्यातील व्याहाड, तसेच अन्य गावातील रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत. काही मार्गांवर अपघातही झाले. रस्त्यांवरील झुडपे तोडून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
गोंडपिपरी : परिसरात रानडुकर तसेच अन्य प्राणी शेतातील पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वन्यप्राण्यांमुळे रात्री जागली करणे कठिण झाले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज वीज भरले नसल्याने नळयोजना बंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे तर काही गावांमध्ये वीज बिल भरले नसल्याने या नळयोजना बंद पडल्या आहे. ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या नळयोजना सुरु कराव्या, अशी मागणी आहे.