चंद्रपूर : येथील सराई बाजारातील नगरपालिकेच्या मालकीची मध्यवर्ती जकात इमारत परिसर तसेच अन्य जुन्या पडित इमारतीमध्ये सध्या अवैध धंदे सुरु आहे. या इमारतींना अवकया आली आहे. काही व्यक्ती या परिसराचा घाण टाकण्याची जागा म्हणूनही वापर करीत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.येथील सराई बाजार परिसरात चंद्रपूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर इंग्रज राजवटीत जकात स्वीकारली जात होता. येथेच व्यापार्यांचा माल उतरायचा. जकात भरून व्यापारी आपला माल न्यायचे. दरम्यान, चंद्रपूर शहरात येणार्या बाहेरगावातील व्यक्तींना राहण्याकरिता याच बाजार परिसरात धर्मशाळेची उभारणी झाली. हिच धर्मशाळा म्हणजे सध्याचा मध्यवर्ती जकात इमारत. इंग्रजांना ‘चले जाव’ म्हटल्यानंतर ही इमारत नगरपालिकेच्या ताब्यात आली. नंतर नगर पालिकेमार्फत जकात वसुली केली जायची. दरम्यान जकात वसुली बंद झाली. या इमारतीत १९८0 मध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांचे निवासस्थान होते. शिवाय रामनगर पोलीस ठाणेही याच इमारतीच्या खोल्यात होते. उर्वरित जागेत शहरी सुवर्णजयंती रोजगार हमी योजनेचे कार्यालय नगरपालिकेमार्फत चालविले जायचे. ८२ वर्षे वय असलेली ही इमारत सध्या खंडर झाल्याचे दिसून येत असले तरी या इमारतीच्या बदललेल्या नाना कळांची साक्ष आजही चंद्रपुरातील अनेक व्यक्ती देतात. सध्या या इमारत परिसरात नको ते व्यवसाय केले जात असल्याचे बाजारपेठेतील नागरिकांचे म्हणणे आहे.काही व्यावसायिक येथेच घाण आणून टाकतात. त्यामुळे परिसर दुर्गंंधीचा झाला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या खोल्यात भरदिवसा हे अवैध धंदे चालविले जात असताना याकडे पोलीस आणि महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सुमारे एक एकर परिसरातील ही इमारत वापरात घेणे गरजेचे असून बंदोबस्त ठेवून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
शहरातील पडित इमारतींमध्ये अवैध व्यवसाय
By admin | Updated: May 30, 2014 23:37 IST