मारोडा : येथील चार जुन्या मंदिरातील मूर्ती अज्ञात इसमानी विद्रुप करुन झाडाखाली असलेल्या लाकडी माता मूर्तीची जाळपोळ केली. सदर घटना गुरुवारच्या रात्री घडली. हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच गावात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तणाव शांत केला.मारोडा येथे गुरुवारच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी बस स्थानकाजवळील एक आणि मराठी प्राथमिक शाळेलगत असलेल्या दोन अशा एकूण तीन जुन्या मंदिरातील हनुमान मूर्ती आणि तलावाच्या काठावर असलेल्या झाडाखालील माता मंदिरातील एक मूर्ती अवजाराने फोडून विद्रुप केले व माता मंदिरामागील देवीच्या शेकडो लाकडी प्रतिमांना आग लावली. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाल्यानंतर माता मंदिरात लाकडी प्रतिमा जळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी धावपळ करुन तलावातील पाण्याने आग विझविली. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली असता, मंदिरातील मूर्ती विद्रुप केल्याचे दिसून आले. जुन्या मंदिराची पाहणी केली तर येथेही हाच प्रकार दिसून आला. त्यामुळे गावकऱ्यांत रोष निर्माण झाला. गावात अशी घटना घडली असताना पोलीसपाटील मात्र कामानिमीत्त बाहेरगावी गेले. यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करीत निलंबनाची मागणी केली. दरम्यान, ठाणेदार जी. आर. विखेपाटील यांनी पोलीस पथकासह गाव गाठले. एसडीपीओ महामुनी आणि तहसीलदार सोनवाने यांनीही घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त करीत मूर्ती विटंबना करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. (वार्ताहर)
मारोडा येथे मूर्तीची विटंबना
By admin | Updated: February 7, 2015 00:30 IST