सीसीआय कोमात : भद्रावतीत कापसाला सर्वाधिक भावचंद्रपूर : दिवाळी झाली तरी महाराष्ट्र राज्य पणन सहकारी महासंघाला कापूस खरेदी सुरू करण्यास मुहूर्त सापडलेला नाही. केंद्र सरकारच्या सीसीआयनेदेखील अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले असून सध्या खेडा खरेदी जोरात सुरू आहे. पणन महासंघाच्या केंद्रावर हमी भावाला खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावामध्ये कापसाची विक्री सुरू केली आहे. जिल्ह्यात भद्रावती बाजार समिती अंर्तगत येणाऱ्या मुर्सा येथे सर्वाधिक भावावर कापूस खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात कापूस पट्टा असलेल्या कोरपना, टेमुर्डा, महाकुर्ला येथे अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात वरोरा, राजुरा, भद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे कापूस खरेदी सुरू केली आहे. जिनिंग-प्रसिंग कंपन्यांमध्ये ही खरेदी दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. यावेळी संबंधित बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सर्वाधिक ४ हजार ७०० रुपये भाव भद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे देण्यात येत असून त्या खालोखाल वरोरा तालुक्यात भाव देण्यात येत आहे. मात्र, हे दरदेखील दररोज चढउतार होत आहेत. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्रीला काढलेला नाही. कापसाला भाव मिळतील, तेव्हा खऱ्या अर्थाने कापूस खरेदी सुरू होईल. तोपर्यंत लहान व्यापारी गावागावात जाऊन खेडा खरेदी करीत आहेत.यावर्षी कापूस उशिरा हातात आला. त्यामुळे दिवाळीपूर्वी कापसाचे पैसे मिळाले नाहीत. दिवाळी झाल्यानंतरही पणन महासंघाने कापूस खरेदीची घोषणा केलेली नाही. केंद्र शासनाचे सीसीआय कापूस खरेदी सुरू करीत असते. परंतु सीसीआयनेदेखील अद्याप खरेदी केंद्र उघडलेले नाही. शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला किंमत राहिलेली नाही. पणन महासंघाने खरेदी सुरू केली तर व्यापारी स्पर्धात्मक अधिक किंमतीला कापूस घेत असतात. यावर्षी ती परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला आहे.आधीच पावसाच्या अनिमिततेमुळे कापसाचे पीक उशिरा आले. परतीच्या पावसानंतर पिकांवर रोगराई पसरली होती. त्यात पुन्हा शेतकऱ्यांचे पैसे खर्च झाले. एकीकडे कापसाला भाव नाही, दुसरीकडे कापूस वेचणीकरिता मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरांचे भाव वाढले आहेत. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे. (प्रतिनिधी)भावात तफावतभद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे ४ हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाला भाव दिला जात आहे. त्याच वेळी पणन महासंघ किंवा आयसीसीची खरेदी सुरू झाली असती तर हा भाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक राहिला असता. व्यापाऱ्यांच्या खरेदीमध्ये राजुरा येथे ४ हजार ७०० रुपये तर वरोरा तालुक्यातील माढेली येथे ४ हजार ७०० ते ४ हजार ७०७ रुपये भाव देण्यात येत आहे. चंद्रपुरातही तोच भाव आहे. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही भावात फार तेजी नाही. व्यापारी भाव पाडून कापूस मागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.कोरपन्यात खरेदी कधी?१९८३ पासून कोपरन्यात कापूस खरेदी केली जाते. या भागात सहा जिनिंग-प्रेसिंग उद्योग आहेत. तालुक्यातील टेमुर्डा, महाकुर्ला, चनई (खु.), आशापुरा, सोनुर्ली, नारंडा येथेही कापूस खरेदी होत असते. परंतु यावर्षी व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदी केलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून खासगी खरेदी बंद आहे. गेल्या वर्षी सीसीआयने खरेदी सुरू केल्यावर चांगला प्रतिसाद मिळाला होता.
पणन महासंघाला मुहूर्त सापडेना
By admin | Updated: November 9, 2016 01:59 IST