गडचिरोलीतील शिकारी : मृत पक्षी व शिकारीचे साहित्य जप्तकोठारी : वनविकास महामंडळाच्या कन्हारगाव वनक्षेत्रातील वट्राणा निटात क्षेत्रातील कक्ष क्र. १४८ मधील तलाव परिसरात शिकारीसाठी फिरणाऱ्या तीन जणांच्या शिकारी टोळीला वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांनीे जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. या प्रकारामुळे वनविकास महामंडळाच्या वनात शिकारी टोळीचा वावर वाढला असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यचांदा वनविकास महामंडळाच्या कन्हारगाव वनक्षेत्रात वनाधिकारी पी.जी. निकोडे, वनरक्षक पी.एस. वडगावकर, पी.एल. मलांडे व एस.एफ. चिरांगे गस्त करीत असताना वट्राणा बिटातील कक्ष क्र. १४८ च्या तलावानजीक तिघे जण संशयितरित्या फिरत असताना आढळले. वनाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी व झडती घेतली असता त्यांच्याजवळून चार मृत पक्षी, त्यात पोपट दोन, तिरचिमणी दोन, तिरकमान एक, गुलेर दोन व मातीच्या गोट्या आढळून आले. पक्षी व शिकारीचे साहित्य जप्त करुन अक्षय राजू उसेंडी, सोनु दलसु नरोटे रा. एटापल्ली जि. गडचिरोली व हरिदास गोमाजी कातलाम रा. धामणपेठ ता. गोंडपिंपरी यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७ अन्वये कलम ९, ३९, ४१, ४२ व ५१ नुसार वनगुन्ह्याची नोंद करुन अटक करण्यात आली. याबाबत विभागीय व्यवस्थापक एम.एस. फारुखी यांनी दखल घेत अधिक चौकशी व जंगल गस्त रात्रंदिवस करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना केल्या.गडचिरोली जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात वन्यप्राणी व पक्ष्यांच्या विविध जाती नामशेष होत असताना तेथील शिकारी टोळ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आकर्षित झाल्या आहेत. शिकारी टोळी कन्हारगाव वनक्षेत्रात जेरबंद केल्यानंतर शिकारी टोळ्यांचा वावर वाढला असल्याने सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.आरोपींना आज शनिवारी गोंडपिंपरी न्यायालयात हजर केले असता आरोपींची ३० एप्रिलपर्यंत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास वनाधिकारी पी.जी. निकोडे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)
कन्हारगाव वनपरिक्षेत्रात शिकारी टोळी जेरबंद
By admin | Updated: April 24, 2016 01:01 IST