१० वर्षांपूर्वीची घटना : पुरात वाहून गेल्याने जन्मदात्यांचा मृत्यूसचिन सरपटवार भद्रावती१० वर्षांपूर्वी माझी आई-बाबा व आजोबा पुरामध्ये वाहून गेले. बहीण-भावंडांचा सांभाळ आमच्या व आजीने केला. कष्ट करून आम्हाला लहानाचे मोठे केले. आपल्यासारख्यांनी आम्हाला आधार दिला. आमच्या संवेदना समजून घेत आर्थिक मदत केली. तेव्हा आम्हाला फारसं कळत नव्हत. जेव्हा कळायला लागल, तेव्हाच निर्धार केला की, मदत केलेल्या आपणा सर्वांचा आशिर्वाद घ्यावा. अन् आपला आशिर्वाद घेण्यासाठीच मी आज आपणाकडे आली आहे. या भावना आहेत त्या नम्रताच्या, जी नम्रता भद्रावती येथील मुरलीधर गुंडावार यांच्या भेटीला आली होती.येथील मुरलीधर गुंडावार यांनी आपला ७७ वा वाढदिवस साजरा न करता आई-वडिलांपासून पोरक्या झालेल्या बहिणींच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून काही रक्कम टाकली होती. त्याची मुदत संपल्याने सदर रक्कम घेण्यासाठी नम्रता तिचा पती व अडीच महिन्यांच्या मुलीसोबत गुंडावार यांना भेटायला त्यांच्या घरी आली होती. सदर रक्कम मुरलीधर गुंडावार यांच्या हातानेच स्वीकारेल असा नम्रताचा आग्रह होता. रक्कम स्वीकारताना ती अतिशय भावूक झाली होती. नम्रताची ही ‘नम्रता’ पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. सुमारे १० वर्षांपूर्वी भटाळीहून पद्मापूरला परत येत असताना राजेश इटकलवार, रिता इटकलवार व एकनाथ इटकलवार या तिघांचा इरई नदी पुलावरून वाहत असलेल्या पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. राजेश व रिता इटकलवार यांच्या दोन मुली व एक मुलगा त्यामुळे पोरके झाले होते. या तिघांपैकी नम्रता (९) ही त्यावेळी तिसऱ्या वर्गात शिकत होती. भाऊ ११ तर बहीण आठ वर्षांची होती. या दुर्घटनेमुळे त्यांच्या दु:खाचा पहाडच कोसळला होता. त्यानंतर वडिलांच्या आईने त्यांचे पालनपोषण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांना मदत केली. यापैकी येथील मुरलीधर पाटील गुंडावार हेदेखील एक होते.वृत्तपत्रातून घटनेची माहिती कळल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा राजु गुंडावार यांच्यासह जावून त्या बहिण-भावडांची भेट घेतली. स्वत:चा वाढदिवस साजरा न करता दोनही बहिणींच्या नावाने त्यांनी पाच हजार रुपयांची रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकली. फिक्स डिपॉझिटची मुदत संपल्याने ती दहा हजाराची रक्कम घेण्यासाठी नम्रता आली होती. मुरलीधर गुंडावार यांच्या हस्ते तीने ती रक्कम स्वीकारली. आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता गरजवंतांना त्यातील रक्कम द्यावी, हा संदेश गुंडावार यांनी दिला. तर मदत करणाऱ्यांना आयुष्यभर विसरायचे नसते हे नम्रताने आपल्या विनम्र स्वभावातून व कृतीतून दाखवून दिले.
आई-वडिलांपासून पोरक्या झालेल्या नम्रताची अशीही ‘नम्रता’
By admin | Updated: August 30, 2015 00:41 IST