जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : परवाना नुतनीकरणासाठी अटींची तत्काळ पूर्तता कराचंद्रपूर : परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे. परवान्यासाठी लागू असलेल्या अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे परवाने अडवून ठेवले आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत अटींची पूर्तता करावी, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल्स व्यावसायिकांना दिला आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या अलिकडच्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. याशिवाय हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे बाहेर शहरातून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याचा विचार करीत चंद्रपूर शहरात अनेक जणांनी हॉटेल थाटून आपला व्यवसाय सुरू केला आहे. शहरात लहान हॉटेल्ससोबत शंभरावर मोठे हॉटेल्सही आहेत. या मोठ्या हॉटेल्स मालकांना महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी हॉटेल्समध्ये आग सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता व बांधकाम नियमानुकूल असणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल्स मालकांनी या अटींची पूर्तता केलेली नाही. काही व्यावसायिकांनी कागदोपत्री निवासी जागा दाखवून हॉटेल्सचे बांधकाम केले आहे. परंतु महानगरपालिकेत जाऊन त्याचे व्यावसायिक रुपांतर केले नाही. याशिवाय अनेक हॉटेल्समध्ये नियमानुसार वाहनतळ नाही. त्यामुळे हॉटेल ज्या परिसरात आहे, त्या परिसरात वाहतुकीचा प्रश्न उद्भवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हॉटेल्सचे परवाना नूतनीकरण अडवून ठेवले. परवाना देताना लागू असलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जाईल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या संदर्भात महानगरपालिकेलाही निर्देश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेकडूनही हॉटेलमध्ये आग सुरक्षा यंत्रणा आहे का, स्वच्छता ठेवली जाते का, वाहनतळ आहे का, या बाबी तपासूनच तसे प्रमाणपत्र दिले जात आहे. विशेष म्हणजे, २१ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिकांची बैठक घेऊन या संदर्भात निदेश दिले होते. बुधवारी निवासी जागेवर बांधकाम करणाऱ्या शहरातील १९ हॉटेल्स मालकांना प्रशासनाकडून दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी विविध मुद्यांवर जिल्हा प्रशासनाने हॉटेल्समालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसचे समाधानकारक उत्तर व्यावसायिकांकडून देण्यात आले नसल्याची माहिती आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत सर्व अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी करून परवाना नूतनीकरण करून घ्यावा, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हॉटेल्स व्यावसायिकांना अल्टिमेटम
By admin | Updated: October 10, 2015 00:14 IST