सात महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा : जिल्ह्यात २०० कर्मचारी
चंद्रपूर : समाजकल्याण विभागातंर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात कामगार क्रिस्टल इटिग्रेटेड सव्हिसेस कंपनीतंर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाकडे अनेकदा वेतनाची मागणी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत.
गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे वसतिगृह चालविण्यात येतात. या वसतिगृहात सुरक्षारक्षक, मदतनीस यांच्यासह विविध पदावर सुमारे २०० च्यावर कंत्राटी कामगार क्रिस्टल इटिग्रेटेड सव्हिसेस कंपनीतंर्गत काम करीत आहेत. मात्र येथील सर्व कर्मचाऱ्यांना मागील मार्च महिन्यांपासून वेतन देण्यात आले आहे. पूर्वीच तटपुजे वेतन त्यातही मागील सात महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करण्यात आली. कोरोनासारख्या विषाणूचा जिल्ह्यात उद्रेक असताना हे कर्मचारी प्रमाणिक सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना वेतनाची प्रतीक्षा लागून आहे.
बॉक्स
दोन वर्षांपासून पीफमध्ये पैशाचा भरणाच नाही
पूर्वी वेतनातून ७०० ते ८०० रुपये कपात करुन कंपनीतर्फे पीफमध्ये पैसे भरण्यात येते होते. मात्र आता वेतनातून पैसे कपात करण्यात येत असूनसुद्धा पीएफमध्ये पैसे भरण्यात येत नसल्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओरड सुरु आहे. तसेच वेतनाची पावतीसुद्धा देण्यात येत नाही. त्यामुळे नेमके वेतनातील पैसे कुठे व किती कपात होतात. याबाबत समजण्यास अडचण जात आहे. त्यामुळे पीएफचे पैेसे भरण्यात यावे, वेतनस्लीप देण्यात यावी, तसेच थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी वसतिगृहात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराकडून करण्यात येत आहे.
कोट
समाजकल्याण विभागाकडून देण्यात येणारा फंड आम्हाला मिळाला नाही. त्यांना मागणी केली असता आमच्याकडील निधी कोरोनामध्ये गुंतला असल्याचे कारणे देण्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहेत.
शैलेश खोब्रागडे,
सहाय्यक व्यवस्थापक, क्रिस्टल इटिग्रेटेड सर्व्हिसेस