घोडाझरी अभयारण्याच्या निर्मितीने पर्यटनाला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:16 AM2018-02-03T01:16:10+5:302018-02-03T01:16:23+5:30
घोडाझरी या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नवीन अभयारण्याच्या निर्मितीने या परिसरात पर्यटनाला, तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : घोडाझरी या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नवीन अभयारण्याच्या निर्मितीने या परिसरात पर्यटनाला, तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अशी माहिती या अभयारण्यांच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नुकतीच घोडाझरी या नवीन अभयारण्यांच्या निर्मितीसाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. भांगडिया यांनी संवाद साधला. आ. भांगडिया म्हणाले, घोडाझरी हे नैसर्गिक संपदेने नटलेले, अलौकिक वनवैभव लाभलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. विपूल वनसंपदेमुळे या अभयारण्याची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, यासाठी या पर्यटनस्थळाचा आदर्श असा विकास करण्यात येईल. येथे चांगल्या दर्जाच्या सोई सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
वनविभागाने पुढाकार घेऊन या अभयारण्याच्या विकासाचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा, मुख्य मार्गालगत हे अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी सर्व दिशांकडून पोहोचणे सोयीचे आहे. जंगल सफारी आणि व्याघ्र पर्यटनासाठी राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घोडाझरी येथे येतील, असे ते म्हणाले.